फक्त जरा वेगळं -१

VN:F [1.9.3_1094]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

कधीकधी मला उगाचच काहीच्याकाबही टाईप करायचा मूड येतो. काही कारण नसतानाही उगाचच खडाखड टाईप करत जावं अन् विचारही करू नये की आपण काय लिहितोय. मग कीबोर्डचा मस्त कुडकुड आवाज येतो अन् आपण महत्वाचं काहीतरी करत असल्याचा एक भास निर्माण होतो. अन् मस्त वाटतं.
उद्या सुट्टी. परवा सुट्टी. तेरवासुद्धा सुट्टी. एरवी सोमवारी सुट्टी नसते पण परवा लेबर डे आहे म्हणून सुट्टी आहे. मी परवा म्हणलो का? मला तेरवा म्हणायचं होतं. कसं आहे. की परवा रविवार आहे रविवारी सुट्टी आली की पोपट होतो. पण लेबर डे ची सुट्टी रविवारी द्यून काय उपयोग? ना??? मग सोमवारी सुट्टी आहे हे बरंच आहे की. पण सांगायचा मुद्दा असा की सुट्टी रविवारी नाही सोमवारी आहे. म्हणजे रविवारी सुट्टी नाही असं नाही. रविवारी सुट्टी आहेच. कायमच असते. रविवारची सुट्टी कुठेच जात नाही. आपणच कुठेतरी जातो रविवारच्या सुट्टीला. कारण सुट्टी असते ना रविवारी. घरी बसून काय करणार. कंटाळा येणारच. शेवटी माणून आहे. आधीपण माणूसच आहे पण “माणूस आहे” या वाक्याच्या आधी शेवटी लावतात कधीकधी. वेळ जात नाही लोकांचा. कारण सुट्टी असते रविवारी. पण रविवारची सुट्टी अन् सोमवारची सुट्टी वेगळी. सोमवारची लेबर डे. रविवारची सुट्टी रविवारची. शनिवारची पण सुट्टी आहे. ती शनिवारची. ब्ल़ॉग आहे म्हणून काय वाट्टेल ते लिहायचं याला काय अर्थ आहे? पण लिहायचं. सोडायचं नाही. कारण वेळ जात नाही. रविवारी सुट्टी आहे. पण आज तर शुक्रवार आहे. मग आज काय विषेश. आज दुबईत सुट्टी असते शुक्र है शुक्रवार है. अन् विशेष चा ष चुकलाय. ष श. दोन वेगवेगळे श आहेत, जशा रविवारच्या अन् सोमवारच्या सुट्ट्या वेगळ्या तसं. फक्त जरा वेगळं.

VN:F [1.9.3_1094]
Rating: 0 (from 0 votes)

7 Comments

एक अशीही प्रश्नपत्रिका

VN:F [1.9.3_1094]
Rating: 4.5/5 (4 votes cast)

वेळ : ३ तास
विषय : सगळे
गुण : १००

सूचना :

१. उत्तरपत्रिकेच्या दोन्ही बाजूस लिहावे.
२. प्रश्नाचे गुण समोर कंसात दिले आहेत.
३. उगाच शंभरपेक्षा जास्त गुणांचा पेपर लिहायचा प्रयत्न करू नये. असला आगाऊपणा तपासणं ही जबाबदारी मंडळाची नाही.
४. उत्तरपत्रिका लिहिलाना एकाच रंगाच्या शाईचा वापर करावा. ही परीक्षा आहे, रंगपंचमी नाही.
५. कॉपी करताना पकडले गेल्यास तात्काळ पाच गुण वजा केले जातील.
६. पण वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या उत्तरांशी आढळणाऱ्या साधर्म्यानुसार “संभाषण कौशल्य” या विषयाची श्रेणी ठरवली जाईल.
७. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाने कोणाच्या धार्मिक, सामाजिक अथवा इतर भावना दुखावल्या गेल्यास त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.
८. टेरीफ प्रमाणे पैसे देणे, कृपया सुट्टे पैसे देणे

आवांतर वाचनावर आधारित असल्याने या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न विशेषकरून “चंद्राळली लाट वर गगनाला भिडे” या ओळीवर आधारित असतील.

प्र १ : निबंध लिहा [संपूर्ण लिहिता येत असल्यास कोणताही एक, नाहीतर कितीही लिहा, काय फरक पडतोय ]  (१५)
१. मी ढगात गेलो तर
२. गटारी अमावस्या
३. गगन भिडे आणि भारतीय अर्थव्यवस्था
४. भारतातील हत्तींचे कमी होणारे प्रमाण अन् त्याचा शिक्षणावर होणारा परिणाम
६. गाय

प्र २. थोडक्यात उत्तरे लिहा [कोणतेही पाच] (२५)
१. गगन भिडे कोण?
२. तुम्ही गगन भिडे आहात असे समजून वरील वाक्यातील परिस्थितीचे व्यक्तीसापेक्ष वर्णन करा.
३. खरंच, गगन भिडे कोण?????
४. ” चंद्राळली लाट ” काय आहे? काय केल्याने ती उतरते? या क्रियेतील जैविक प्रक्रियेचे वर्णन करा
५. हायड्रोक्लोरिक अॅसिडचा कौटुंबिक मालिकांमधील वापर
६. चंद्र, सूर्य अन् पृथ्वी यांच्यात नव्वद अंशांचा कोन असताना उत्तर ध्रुवावर काय स्थिती असेल याचे वर्णन करा,

प्र ३. निबंध, इंग्रजी [प्र. १ प्रमाणे...] (१५)
क्वेश्चन वन मधले एस्सेज आपल्या डेली लॅंग्वेजमधे लिहा.

प्र ४. टीपा लिहा [कोणत्याही तीन] (१५)
१.  एकविसाव्या शतकातल्या कविता अन् त्यांचे कपडे
२. कॉपीपेस्ट
३. गगन भिडेची कारकीर्द
४. चंद्राळल्या लाटेचा इतिहास
५. चंद्राळल्या लाटेचा खरा इतिहास

प्र ५. फरक लिहा (15)
१. चंद्राळली लाट आणि काजूफेणी
२. लुबाडणूक आणि महाविद्यालांचे प्रवेशमूल्य
३. माझं म्हणणं आणि तुमचं म्हणणं.

प्र. ६.  उताऱ्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. [15]

“माणसाला थंडीत थंडी वाजते, पण थंडीचा आवाज येत नाही. आवाज काढता येतो. आवाज जरी वेगवेगळ्या ठिकाणी काढता येत असला तरी कानाखालच्या आवाजाला मानवी इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. या आवाजाला भलेभले घाबरतात. आवाजाची तीव्रता काढणाऱ्याच्या शारिरिक क्षमतेवर अवलंबून असते, थोडक्यात आवाज हा शक्तीशी निगडित मानला गेला आहे. किंबहुना म्हणूनच मतदानाच्या प्रकारांत आवाजी मतदान या नावाने एक प्रकार प्रचलित आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रचार अन् विजयानंतरच्या घोषणांमधेही आपल्याला ‘आवाज कोणाचा’ ऐकू येतं. ज्याचा आवाज वरपर्यंत पोहोचत नाही तो स्वतःला दुर्बल समजतो. शक्तीचे इतर मार्गांनी प्रदर्शन करून तो आपला ‘आवाज’ ‘ वर’ पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो…. ऐकावं ते नवलच !!!”

१.   काय कळलं?

VN:F [1.9.3_1094]
Rating: +5 (from 5 votes)

22 Comments

चहा, पुन्हा एकदा

VN:F [1.9.3_1094]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
चहाचे पुडे

चहाचे पुडे

आज चक्क जरा आवराआवरी करायचा मूड आला. म्हणलं चहाची रिकामी खोकी चहाच्या कप्प्यातून काढून इतर रिकाम्या खोक्यांबरोबर ठेवावी. गेल्या इन मीन आठ महिन्यांत  मोठ्या आनंदानं घशाखाली घातलेल्या चहाकडे बघताना मन अगदी भरून आलं. आहा ! काय ती चव !!! अमृताशीही पैज जिंकेल अशी एक माझी मराठी अन् दुसरा हा चहा !!!

आहाहा !

आहाहा !

इंग्लिश ब्रेकफास्ट त्यातल्यात्यात आपल्या नियमित चहाजवळ जाणारा. बाकी “चाय” म्हणून जो काय प्रकार असतो तो नुसताच मसाला चहा. काहीतरीच… मसाला चहा म्हणजे काही “चाय” नाही. चाय ला त्या विशिष्ट पेल्याशिवाय, माशांबरोबरच वातावरणात घोंगावणाऱ्या वटाटावड्यांच्या वासाशिवाय अन् फुंकर मारताच येणाऱ्या पातळ सायीशिवाय अगदीच मजा नाही. खरं तर उकळलेल्या पाण्यात पिशवी बुडवून “चहा” ची “ती” चव मिळवणं केवळ अशक्यच.

आवरा

आवरा

चहाची चव येते तीच मुळात दुसऱ्या उकळीनंतर.  सध्या “त्या” चहाला मुकतोय, वेगवेगळ्या चवी अन् प्रकारांवर समाधान मानतोय. या वीकांतात एक पातेलं आणावं म्हणतो, चहा उकळायला. मधे दोनदा प्रयोग करून पाहिले, आमरसाच्या डब्यात चहा उकळायचे. पण डब्याचं बुड शेगडीवर नीट टेकत नाही त्यामुळे फक्त कड तापते अन् चहा नीट उकळत नाही. मग कंटाळा येतो.

असो, झोपतो आता. गेले काही उगाचच एका गंभीर विषयावर लिहायचा प्रयत्न करत होतो अन् हताश होऊन लिहिलेलं खोडून झोपी जात होतो. नकोच म्हणलं. सध्या चहा बरा.

VN:F [1.9.3_1094]
Rating: 0 (from 0 votes)

8 Comments

वाटेगामाल्बोबोसाकी

VN:F [1.9.3_1094]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

भल्या पहाटे म्हणला तो
मला दोन तू दिसतायत…..
टाकला एक कटाक्ष तुच्छ,
उतरली नाही वाटतं अजून
म्हणला तो, तूही बघ
कधीतरी असं करून

भल्या पहाटे म्हणला तो
मला दोन तू दिसतायत…..
थोर तत्वज्ञान म्हणलो मी
बाबा, तुम्ही ज्ञानसागर…
दे तुझा खिसा मला,
अन् अनुभव माझी पावर

भल्या पहाटे म्हणाला तो,
मला दोन तू दिसतायत….
अरे दोन काय एक काय
म्हणशील तिथं मीच
पण नक्की चुकलास कुठे तू
की माणूस राहिला इतका नीच

VN:F [1.9.3_1094]
Rating: 0 (from 0 votes)

4 Comments

पाच हजार

VN:F [1.9.3_1094]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
पाच हजार

पाच हजार वाचने

ब्लॉगच्या भेटींनी पाच हजारांचा टप्पा गाठला.

मनःबोका आनंदून गेला.

सुरुवातीला केवळ स्थानिक भाषेतलं संकेतस्थळ चालवण्याचं कुतूहल,
त्यानंतर मधून अधून मराठी अस्मितेबरोबर येणारा अभिमान,
नंतर साता समुद्रांपलिकडून सहज जोपासता येईल असं मराठीशी निर्माण झालेलं नातं
मिळालेला एक नवीन छंद. एक सुखद प्रवास!

मार्जारपुराण, निरर्थक बडबड, कधी आतलाच, नीट व्यक्त करता न येणारा विचार,
कधी चड्डी अन् प्रदेशाविषयीची साधकबाधक मतं,
आवडलेले सिनेमे, सिरीअली,
एखददुसरा अनुभव, कधी वैताग, वैफल्य चिडचिड,
कधी विचारांनीच चढलेल्या रात्रीची धुंद शब्दफेक

कधी नुसतीच पोष्ट. किंचित हसवणारी. कधी उगाचच विचारात ढकलणारी.
कधी डोक्याला खाद्य तर कधी नुसतंच डोकं खाणारी…
कधी उगाच मांजरासारखी… मऊ, स्वतःचेच लाड करणारी

अर्थमैथुन, टमरेल, स्पिरिट, कोडचा किडा, सचिनचे क्लोन,
लिव इन रिलेशन, विचार, मांजर इतकं मऊ का असतं वगैरे,
आणखीही बरंच काही
सार्थ अन् निरर्थक…

मुक्ताफळं, उधळलेली, चौफेर
तुम्ही वाचलीत, आनंदानं, आपुलकीनं अन् मला मित्र बनवून घेतलंत,

मनापासून, अगदी मनातल्या बोक्याच्याही मनापासून

सर्वांचे आभार,

शतशः, सहत्रशः आणि क्रमशः

VN:F [1.9.3_1094]
Rating: +1 (from 1 vote)

12 Comments

खास पुणेरी आनंद

VN:F [1.9.3_1094]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

गेल्या महिन्यात ऑफिसची जागा बदलली. पुढच्या आठवडाभरात जाण्यायेण्यासाठी योग्य असा कमी रहदारी, सायकल सुसाट असा रस्ता शोधून काढला. दोन आठवडे होतात न होतात तोच एका भल्या सकाळी एक युनिफॉर्मातील मनुष्य रस्त्यावर शुभ्र रेघोट्या मारताना दिसला. तेव्हाच रस्त्यावर होणाऱ्या आगाऊ खोदकामाची चाहूल लागली. माझा आवडता कर्वेरोड पुणे मनपाकृपेने कायम खोदलेला असतो. गेल्या आठ महिन्यात त्याचं दर्शन झालं नाही, जरा चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. आज संध्याकाळी ऑफिसहून परतताना रस्त्यावर काम सुरू झाल्याची ठळक लक्षणं दिसू लागली. थोडंसं खोदकामही दिसलं अन् एका अपरिमित आनंदानं मन प्रफुल्लित झालं. परदेशात खड्डा पाहून होणाऱ्या या आनंदाला पुणेरी आनंद म्हणत असावेत.

बंड्या एकदा रस्त्यातून जात असतो, त्याला सदाशिव पेठेत राहणारे जोशी भेटतात, ते प्रचंड आनंदात असतात. बंड्या विचारतो, काय काका, काय विशेष?? जोशीकाका सांगतात, “अरे, शेजारच्या नेन्यांना लॉटरी लागली”. बंड्या जरा गोंधळतो, विचारतो, “पण मग तुम्हाला एवढा आनंद का”?
जवळजवळ उड्या मारतच जोशीकाका उत्तरतात, “त्यांना तिकीट सापडत नाहीये.”

हा तो आनंद.

मार्च महिन्यात माझ्या खोलीत एक जिवंत उडता डास दिसला तेव्हाही मला असाच आनंद झाला होता. पावसाळ्यात “मूठ मिटेन तिथं डास मारेन”  या म्हणीला जागणारा मी त्या डासाकडे केवळ कौतुकानं बघत राहिलो. दोन दिवसांनी मला तो डास बेसिनपाशी सापडला, तेव्हा तो आपल्यात नव्हता. कदाचित माझा स्वयंपाक त्याला सोसला नसावा. मधे एकदा चिपोट्ले मधे माशी दिसली (दुकानात, पदार्थात नाही) तेव्हाही मला उकळ्या फुटल्या होत्या.

एकदा मात्र भुंग्याएवढा मोठा आणि टण्ण्या किडा खोलीत घुसला होता आणि भयंकर आवाज करत खोलीभर उडत होता, त्यानं मात्र वैताग आणला. अखेर टेलिफोन डिरेक्टरीच्या सहाय्यानं त्याला भिंतीत चिनून टाकला, अनारकली श्टाईल (ती डिरेक्टरी आजूनही त्याच स्थितीत आहे. तो भुंगा तिथंच असेल आणि आजूनही जिवंत असेल या भितीनं मी काही ती डिरेक्टरी तिथून हालवणार नाहीये.) त्या किड्याशी विजयी युद्ध करून झाल्यानंतर मात्र जरा बरं वाटलं. पुण्यात संध्याकाळी घरात पाकोळ्या घुसून बसायच्या, इथे जगाच्या दुसऱ्या टोकावर किमान भुंग्यावर तरी सराव करता आला याचं समाधान मिळालं.

बाकी, सध्या काम आणि गेम यात पुरता गुंतलोय. सत्तावीस जुलैला ब्लिझार्डनं स्टारक्राफ्ट-२ रिलीझ केला. तेव्हा मनावर मोठ्या मुश्किलीनं ताबा ठेवला. अन् वाट बघण्याच्या अत्यंत क्लेशकारक अशा प्रदीर्घ अडीच दिवसांनंतर तो गेम डाऊनलोड करून लॅपटॉपवर इन्स्टॉल केला. शिवाय ऑफिसमधे रिलीजची धावपळ आहे ती वेगळीच. एकूणच मजा आहे.

असो, झोपतो आता.

आपला

~ नॅकोबा

VN:F [1.9.3_1094]
Rating: 0 (from 0 votes)

12 Comments

भरकट

VN:F [1.9.3_1094]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

एकदा एका मित्राला बळंच पिळावसं वाटलं,
त्याला विचारलं, बाबारे, तुझा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन काय ?
अत्यंत निर्विकार चेहेऱ्यानं त्याचा प्रतिप्रश्न आला,
डावा की उजवा?
त्य़ाच्या प्रश्नातले ‘जग’ उमजून मी गार पडलो.

प्रत्येकाचं जग किती वेगवेगळं असतं नाही?
माझ्या प्रश्नातलं जग अन् त्याच्या प्रश्नातले जग, काय ही तफावत.

जग संपणार, जग संपणार असं कोणी ना कोणीतरी दर काही वर्षांनी बोंबलतं. मला जगबुडीच्या बातम्यांवर विश्वास ठेवायला आवडतं. नैसर्गिक कारणानं किंवा परग्रहवासियांच्या हल्ल्यात पृथ्वी, किंवा किमान मनुष्य प्रजाती खलास झाली तर माझी काही हरकत नाही. अंतापासून अवघे दोनचार वर्ष दूर असताना मानव म्हणून आपली अवस्था काही फार बेक्कार नाही. तंत्रज्ञान आहे, खरंखोटं काही का असेना, चंद्राला धप्पा देऊन झालेला आहे, समुद्रतळाला भोक पाडून ते बुजवूनही झालं आहे. बरं चाललंय की. एकमेकांवर अण्वस्त्रे वापरून आपण अण्विक हिमयुगात कोणत्यातरी गुहेत किरणोत्साराचे अपाय सहन करत नाही आहोत हेही नसे थोडके. त्यातल्या त्यात बऱ्या युगात जग संपावं असं मानणारा हा माझा अर्धा पेला. अर्धाच, पण भरलेला…

अर्ध्या भरलेल्या या पेल्याचे दोन भाग असतात, एक रिकामा, एक भरलेला, सगळे सांगतात की भरलेला अर्धा भाग पहावा. फक्त काहीच लोक असे असतात, की जे हा भरलेला अर्धा भागही रिकामा करू शकतात, स्वतःच्या खिशात. कधीकधी सगळ्यांसमोर. यांना नशा आणतं हे अर्धं प्राशन, उरलेल्यांसाठी जे उरतं ते लोकशाहीतलं शासन.

VN:F [1.9.3_1094]
Rating: +1 (from 1 vote)

1 Comment

आज मला पोस्ट लिहायची आहे

VN:F [1.9.3_1094]
Rating: 3.7/5 (3 votes cast)

आज मला पोस्ट लिहायची आहे.

मराठीत ज्याला इर्रेलवंट म्हणतात असं असंबद्ध काही बरळायचं आहे.
जमल्यास निरर्थक असंही काही खरडायचं आहे.
ड्राफ्ट अमाप झाले आज काही घडवून आणायचं आहे.
डोकं सुस्त झालंय त्यास बडवून काढायचं आहे.

खरं सांगतो, “निरर्थक” निर्मिती अवघड असते. संवादाच्या कोणत्याही माध्यमातून काहीही सादर केलं तरी त्याचे ग्राहक आपापल्या परीने त्या संवादाचा काही ना काही अर्थ काढतातच. ( ह्या ह्या ह्या, कॉमर्सच्या परीक्षांची आठवण झाली. तिथे असली यो वाक्य टाकली की मार्क्स मिळतात. ) उदाहरणार्थ:

माध्यमातून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या संवादाची कार्यक्षमता अन् टॉइंग मानल्या जाणाऱ्या चड्ड्यांच्या मागणीची लवचिकता या दोन्ही गोष्टी एकमेकांशी सम प्रमाण राखून असतात. इन अदर वर्ड्स, efficiency of the communications broadcast through media (use the phrase “communication channels” here, sounds cooler) maintain a direct proportion to the demand elasticity of ‘chaddi’s which are believed to be “toiiing”
नुसतं बघायला गेलं तर ( वाक्याकडे, वाक्याकडे) ये तो बडा टॉइंग है ला काय अर्थ आहे. पण कळणाऱ्यालाच्या टॉइंग मनाला बरोबर कळायचं ते कळतं.

चड्डी…

काहि दिवसांपूर्वी एक अत्यंत किरकोळ अशी पोष्ट लिहिली होती. चड्डी अशा शीर्षकासह. ब्लॉगवर ती पोष्ट सगळ्यात जास्त वाचली गेल्ये. लोक चड्डी असा गूगल सर्च करून इथपर्यंच पोहोचतात. मी तसा कधीच पोहोचलो नाही. पण मी तो सर्च केला का नाही हा मात्र सस्पेंस ठेवतो.

फेब्रुवारी मार्च च्या सुमारास जेव्हा मराठी ब्ल़ॉग नियमितपणे लिहायला लागलो तेव्हा अगदी काहाही पोष्ट करायची तयारी असायची. हल्ली कोणाला घाबरतो देव जाणे. खरंतर कोणाचीही काहीही न ठेवता कोणत्याही विषयावर काहीही खरडायचा परवाना मला जन्माने (पुणे) मिळालाय, तरीही,  राजकारण, शिक्षणव्यवस्था, देव, अमेरिका या विषयांवर लिहायला कोण जाणे का पण नको वाटतं.

असं हून कसं चालेल? कोणीतरी म्हणलंच असेल

दिसामाजी निरर्थक खरडावे,
अकलेस पायदळी तुडवावे,
शब्दाने डोके उडवावे,
चित्ती असू द्यावे, समाधान !!

VN:F [1.9.3_1094]
Rating: +2 (from 2 votes)

6 Comments

एपिसोड

VN:F [1.9.3_1094]
Rating: 5.0/5 (2 votes cast)

काही संवाद, घटना अन् पात्र

मित्र – असं धार सोडून चालणार नाही…

नायक –  अं??????

मित्र - सगळं काही नीट होईल…

नायक – थोडा ओशाळून… पण… तुला कसं कळलं ??

मित्र – अरे, अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात? अत्ताच शेजारची सुमी भेटली, तिनंच सांगितलं…

नायक- काय????? सुमीलाही कळलं?

मित्र – शेजारी बेपत्ता झाल्याचं काय लपून राहतं?

नायक – अं??

मित्र – अरे, काकांना शोधायला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत !!

नायक- काका? गायब?? … ओह्….. त्याबद्दल बोलतोयस तू . हां ते गायब आहेत दोन दिवस झाले…

नायक- ओह् हो हो, म्हणजे तुला म्हणायचं होतं धीर सोडू नकोस….. मग ठीके, मला वाटलं

मित्र – मी तेच म्हणलो… तुला काय वाटलं?

नायक – कुठं काय, ( गडबडून, गंभीर होत) बाबा गायब आहेत रे !

बाहेरच्या दारातून आवाज – नाही पोरा मी परत आलोय.

( दारावर कॅमेरा, एकदा वरून, एकदा खालून एकदा डावीकडून. मग झूम इन, त्यानंतर झूम आऊट. ढिश् झिश् फिश् असा स्पेशल इफेक्ट, मग नुसतीच भिंत. मग चुकीची दुरुस्ती करायला लगबगीनं कॅमेरा दरवाज्यातील व्यक्तीकडे.)

नायक – बाबा तुम्ही? आई, बाबा आले बघ!

( सतार वगैरे वाद्यांसकट रेग्युलर आनंदी क्षण सूचित करणारा  आवाज… मित्र फोन कट करतो, आवाज बंद)

मित्र – ओह् सॉरी, तुमचं चालू द्या

(नायक बाबांच्या दिशेने स्लो मोशन, बाबांचे हात समोर, नायकाला मिठीत घेण्यासाठी,

टू नायक स्लो मोशन, टू बाबा, टू नायक स्लो मोशन, टू बाबा,टू नायक स्लो मोशन, टू बाबा, टू नायक स्लो मोशन, टू बाबा,

पुन्हा नायक, स्लो मोशन. बाबा कंटाळून हात खाली घेतात, नायक पोहोचून मिठी मारणार तोच् )

आई-  तू????????????? तुझी हिंमत तरी कशी झाली इथे यायची? (मुलाकडे बघून) आहेच तिथेस थांब. या माणसाच्या सावलीसही  उभा राहू नकोस….

मित्र – तुम्हाला “आहेस तिथेच” म्हणायचंय का? कारण आहेच तिथेस असं काही नसतं या जगात.

नायक – (गोंधळून) आई??? बाबा??? ( वैतागून) आधीच नाही का सांगायचं…. बळंच चालायला लावलं राव, एक तर ही अवस्था…

मित्र – कोणती अवस्था

नायक – कुठं काय? बाबा आलेत बघ !

आई – हा माणूस तुझा बाप नाही!!!!

(कॅमेरा आईकडे. वरून, खालून, डावीकडून, विथ स्पेशल इफेक्ट… अचानक कॅमेरा धप्पकन् आडवा… सावरून सरळ, पुन्हा आईकडे.)

आई – हा नक्कीच तो. यांचा जुळा भाऊ. एकदा फसले,  दोनदा फसले,  आता  लक्षातही नाही कितीदा फसल्ये ते पण आता फसणार नाही.

नायक – (एकाच वेळी हताश, अन् आश्चर्यचकित) आई, काय बोलत्येस तू? कोण जुळा भाऊ, कोणी फसवलं कोणाला?

आई – अरे, सोडून दे, ते मनातल्या मनाल होतं.

नायक – अं?

आई- नायकाकडे पूर्ण दुर्लक्ष करून – अत्ताच्या अत्ता चालता हो…

(तेवढ्यात आणखी एक आवाज)

आवाज – मला वाटलंच, मी गायब झाल्याचं पाहून तू इथं येशील

(आवाजाकडे कॅमेरा, स्थिर, नुसतेच साऊंड इफेक्ट्स… अस्पष्ट कुजबूज …… अरे हलव की…. नाही जा…… चक्कर…… डॉक्टरांचं बिल…. एक शिवी….)

बाबा- तू??????

आई- तुम्ही???????

मित्र- काका???????

नायक- अं???

आवाज – होय, मी परत आलोय…

बाबा१ – (कुत्सित संतापासह) मी तुला रस्त्यावर आणीन…

बाबा२- (तितक्याच कुत्सितपणे) पण मी आत आलोच कुठंय.

नायक – हा काय प्रकार आहे

आई – जरा प्लॅन चुकला खरा… यानं खीर खायला उशीर केला म्हणून. नाहीतर एव्हाना हा डॉक्टरकडे गेला असता. मग मी, ह्यांचा जुळा हा, हे आणि ह्याचा हा.

ह्या दोघा जुळ्यांना एकमेकांत जुंपून आम्ही दोघं पळून गेलो असतो. अन् नंतर गॅसच्या स्फोटाची बातमी वाचून विमा खायला आलो असतो.

नायक- काय??????????????

मित्र- (गडबडून) अरे, येतो रे मी.

बाबा१- काय???????????????

बाबा२- (आधीच्याच कुत्सितपणे) गॅस संपलाय !!!

बाबा१ – रस्त्यावर आणीन तुला

आई- मी हेसुद्धा मोठ्यानं बोलले वाटतं… असंच होतंय हल्ली…

सुमी – तरीच स्फोट नाही झाला आजून…

(तेवढ्यात एक मोठा आवाज, कॅमेरा कॅलेंडरकडे, १२ डिसेंबर २०१२, वार मात्र रविवार… मग पाणीच पाणी, कॅमेरा हळूहळू डावीकडे सरकतोय. पाण्यातच वाळू, काही वनस्पती, एक मासा समोरून निघून जातो, मागे बुडबुडे सोडणारं यंत्रं… फेड टू ब्लॅक)

VN:F [1.9.3_1094]
Rating: +1 (from 1 vote)

, , , , , , ,

No Comments

भविष्यकाळचा इतिहास, मानव, क्लोनिंग, यंत्रमानव आणि सचिन

VN:F [1.9.3_1094]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

आज एक बातमी वाचली की सचिनवर एक पुस्तक बनतंय, या पुस्तकात एक कागद आहे, सचिनच्या सहीचा… तो कागद बनवताना त्याच्या लगद्यात सचिनचं रक्त मिसळलं जाणार आहे आणि अशा प्रकारे बनवल्या गेलेल्या पुस्तकांची किंमत कैच्याकै असणार आहे.

त्यावरून सुचलेली ही गोष्ट

२०१२ पॉल द ऑक्टोपसची भविष्यवाणी : भविष्यकाळचे मानव इतिहासाच्या पानांतून आपल्या देवाला साकडं घालतील. यंत्रमानवांच्या जाचक साम्राज्यातून मानवाला मुक्त करण्यास हे सचिन पुन्हा एकदा बॅट तळपतील. (फिफा वर्ल्डकप नंतर वर्षभरात हा बोलायलाही शिकला होता)

वर्ष २२९५….

खरंतर जग २०१२ सालीच संपणार होतं. मानवानं प्रयत्नांची पराकाष्ठा करून शेवटच्या वर्षात अतिषय प्रगत यंत्रमानव निर्माण केले जे समुद्रतळाशी स्थित पाणबुडीत निद्रिस्त मानवांची काळजी घेउ शकतील अन् भूपृष्ठावरचं वातावरण पुन्हा एकदा वसाहतयोग्य झालं की त्यांना पुन्हा जागं करतील.

पण निसर्गानं महापोपट केला… आणि यंत्रमानवानं मानवाचा बकरा बनवला. मानवाच्या मूर्ख वागणुकीस कंटाळून यंत्रमानवांनी कारभाराची सगळी सूत्रे ताब्यात घेतली.

उरल्यासुरल्या मानवांनी पुण्यात आसरा घेतला. वाहतूकव्यवस्था पाहूनच यंत्रमानव पुण्यात यायला टरकत.

पुणे स्थित या मानवांनी क्लोनिंगचं तंत्र पूर्णपणे आत्मसात केलं होतं. यंत्रमानवांपासून महत्प्रयासानं वाचवलेल्या इतिहासात सचिनचं रक्त असलेली ही पाने होती. मानवांनी ठरवलं की सचिनचे क्लोन तयार करायचे आणि यंत्रमानवांना क्रिकेट मॅचसाठी च्यॅलेंज करायचं.

आमिर खानच्या क्लोनला बोलणी करायला पाठवलं.

“तीन गुना लग्गान…” आमिरचा क्लोन…
“मामू, ये कौनसा डायलॉग मारा? अपनेको तो राईटवाला टॅटू पढना था..” अर्षद वारसीचा क्लोन (रक्तरंजित पानांचं २०११-१२ मधे मजबूत पेव फुटलं होतं… काय करणार… )
“सगळा संवाद हिंदीत? तेही पुण्यात!! अरेरे, काय ही मराठीची अवस्था !!” … एक मराठी माणूस
“इन्सर्ट कॉईन टू स्टार्ट द गेम”… यंत्रमानव
“सुट्टी नाणी मागू नयेत, मिळणार नाहीत”… एक पुणेरी पाटी

दहा सचिन आणि एक सिद्धू अशी टीम तयार झाली. हो, ओरिजनल सिद्धू अजूनही तसाच होता. कारण लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन, हसण्यानं आयुष्य वाढतं.

दहा सचिनपैकी एक सचिन परत क्लोन करावा लागला. कोण्या नतद्रष्टानं नेमक्या त्याच पानावर डास मारला होता. काय हा निष्काळजीपणा… असो.

मी क्रिकेट फार फॉलो करत नाही. मला कालच्या मॅचचे तपशील नाहीत नसतात २२९५ च्या मॅचबद्दल न बोललेलंच बरं. एवढं मात्र नक्की की दहाही देवांनी अफलातून खेळी केली अन् मानवांनी मॅच जिंकली…

यंत्रमानवात टाकलेलं नाणं २०१२ सालचं एक रूपयाचं होतं. त्याच्या ऐतिहासिक मूल्याच्या तिप्पट रक्कमेचं गणित करताना यंत्रमानव ओव्हरलोड झाले अन् पृथ्वीवर प्रदूषण पसरवण्याल मानव पुन्हा एकदा मोकळा झाला.

VN:F [1.9.3_1094]
Rating: 0 (from 0 votes)

15 Comments